नेपाळमध्ये महाराष्ट्रातील ८० हून अधिक पर्यटक अडकले; चार जणांशी संपर्क


नेपाळमध्ये महाराष्ट्रातील ८० हून अधिक पर्यटक अडकले; चार जणांशी संपर्क
कैलास मानस सरोवर यात्रेवरील भाविकांचाही समावेश; जिल्हाधिकाऱ्यांना पर्यटकांची माहिती संकलित करण्याचे निर्देश
नाशिक : नेपाळमध्ये महापुरामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत महाराष्ट्रातील ८० हून अधिक पर्यटक व भाविक अडकले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आतापर्यंत त्यापैकी चार जणांशी संपर्क साधण्यात प्रशासनाला यश आले असून, इतर पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नेपाळमध्ये कैलास मानस सरोवर यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची संख्याही अद्याप स्पष्ट झालेली नाही.
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील पर्यटकांच्या शोधासाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून नेपाळ सरकारच्या संपर्कात आहे. महाराष्ट्रातील पर्यटक दोन बसमधून नेपाळला गेले असून, या बस रिचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या आहेत. या दोन बसमधून प्रत्येकी ४५ जणांचे असे दोन गट गेले असल्याची माहिती आहे. त्यापैकी चार जणांशी संपर्क झाला असून, उर्वरित नागरिकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याचेही महाजन यांनी सांगितले.
कैलास मानस सरोवर यात्रेवरील भाविक सुरक्षित
महाजन यांनी सांगितले की, त्यांच्या घराशेजारील एक कुटुंब कैलास मानस सरोवर यात्रेसाठी नेपाळमार्गे गेले आहे. त्यांच्याशी संपर्क झाला असून ते सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. या गटात महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील मिळून ३७ पर्यटक व भाविक आहेत. त्यामध्ये आंध्र प्रदेश, दक्षिण भारत तसेच मुंबईतील नागरिकांचा समावेश आहे. यापैकी महाराष्ट्रातील नागरिकांची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.
दरम्यान, नेपाळमध्ये पूल, गावे आणि जलविद्युत प्रकल्प वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. भूस्खलनामुळे नेटवर्क यंत्रणाही विस्कळीत झाल्याने पर्यटकांशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती संकलन सुरू
नेपाळमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची अधिकृत माहिती अद्याप आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मदत कक्षाकडे पूर्णपणे उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातून नेपाळ तसेच कैलास मानस सरोवर यात्रेसाठी गेलेल्या नागरिकांची माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नागरिक किंवा नातेवाईकांकडे नेपाळमध्ये गेलेल्या पर्यटकांची माहिती असल्यास ती संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे किंवा शासनाच्या अधिकृत पोर्टलवर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचा २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत असून, अधिकारी नेपाळमधील नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
“राज्य सरकार केंद्र सरकार आणि नेपाळ प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.” — गिरीश महाजन, आपत्ती व्यवस्थापन तथा नाशिकचे पालकमंत्री




