
जळगावात दिवंगत अभिनेते राजकुमार यांच्या जन्मशताब्दीचा ‘रॉयल’ अंदाज!
‘जानी… हम तो राजकुमार है!’ फलकाने वेधले जळगावकरांचे लक्ष; चाहत्याने अनोख्या पद्धतीने केला लाडक्या अभिनेत्याला सलाम

जळगाव, प्रतिनिधी : हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार आले आणि काळाच्या ओघात त्यांच्या लोकप्रियतेची चमक काहीशी कमी झाली. मात्र आपल्या दमदार अभिनयासोबतच खास संवादफेकीच्या शैलीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिग्गज अभिनेते राजकुमार आजही चाहत्यांच्या स्मरणात कायम आहेत. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जळगावात एका चाहत्याने अनोख्या पद्धतीने आपल्या लाडक्या अभिनेत्याला अभिवादन केले.

अभिनेते राजकुमार (मूळ नाव कुलभूषण पंडित) यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९२६ रोजी झाला होता. यंदा त्यांच्या जन्माला १०० वर्षे पूर्ण झाल्याने देशभरातील चाहत्यांकडून विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. जळगावातही राजकुमार यांचे चाहते दिनेश जगताप यांनी आपल्या दुकानाबाहेर ‘जानी… हम तो राजकुमार है!’ असा आकर्षक फलक लावून त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.
नूतन मराठा महाविद्यालय परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी हा फलक लावण्यात आल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांचे लक्ष त्याकडे वेधले जात होते. राजकुमार यांच्या दमदार व्यक्तिमत्त्वाची आणि त्यांच्या गाजलेल्या संवादांची आठवण करून देणारा हा फलक जळगावकरांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला.
राजकुमार यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक गाजलेले चित्रपट दिले. ‘मदर इंडिया’, ‘पाकीजा’, ‘वक्त’, ‘सौदागर’, ‘तिरंगा’ यांसह अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आणि संवाद आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. विशेषतः त्यांच्या रुबाबदार संवादफेकीची स्वतंत्र अशी ओळख निर्माण झाली होती.
लाडक्या अभिनेत्याच्या जन्मशताब्दीनिमित्त दिनेश जगताप यांनी लावलेला हा फलक म्हणजे केवळ शुभेच्छा नव्हे, तर राजकुमार यांच्या अभिनयाची आणि त्यांच्या अजरामर संवादांची आठवण जपणाऱ्या चाहत्याच्या मनातील आदराची अनोखी अभिव्यक्ती ठरली.



