नाकाबंदीत गुटख्याचा मोठा साठा पकडला; इनोव्हासह १५.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त!
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; केसरयुक्त विमल पानमसाला आणि ‘V-1’ सुगंधित तंबाखू जप्त, चाळीसगावचा वाहनचालक अटकेत

नाकाबंदीत गुटख्याचा मोठा साठा पकडला; इनोव्हासह १५.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त!
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; केसरयुक्त विमल पानमसाला आणि ‘V-1’ सुगंधित तंबाखू जप्त, चाळीसगावचा वाहनचालक अटकेत

जळगाव, प्रतिनिधी : प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नाकाबंदीदरम्यान इनोव्हा वाहनातून वाहतूक केला जाणारा केसरयुक्त विमल पानमसाला आणि ‘V-1’ सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत ८ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित माल आणि ७ लाख रुपये किमतीची इनोव्हा, असा एकूण १५ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी चाळीसगाव येथील वाहनचालक आबा विठ्ठल पाटील (वय ५४) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ ऑक्टोबर २०२६ रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी सुरू होती. यावेळी पहूर येथून चाळीसगावच्या दिशेने जाणारी इनोव्हा (क्रमांक एमएच १८ एजे ६५२५) पोलिसांच्या निदर्शनास आली. नाकाबंदीवर कर्तव्य बजावणारे पोलीस नाईक दीपक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विकी इंगळे आणि डायल ११२ वरील पोलीस कॉन्स्टेबल मनोज महाजन यांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वाहन न थांबविता पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.
८.३३ लाखांचा गुटखा, सात लाखांची इनोव्हा
वाहनचालकाची चौकशी केली असता, त्याचे नाव आबा विठ्ठल पाटील (रा. माऊली नगर, चाळीसगाव, जि. जळगाव) असे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची किंमत ८ लाख ३३ हजार ६०० रुपये असून, इनोव्हा वाहनाची किंमत ७ लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण १५ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची फिर्याद; गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी किशोर हिम्मतराव बाविस्कर यांनी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून सरकारतर्फे फिर्याद दिली. प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २२३, २७४ व २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.
कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोलीस नाईक दीपक पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल विकी इंगळे, शाम हटकर आणि मनोज महाजन यांचा समावेश होता.
जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अशा अवैध व्यवसायांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा डायल ११२ वर कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.




