
जळगाव: जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिसांनी एका वृद्धाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडील २५,००० रुपये चोरणाऱ्या दोन आरोपींना अवघ्या १२ तासांत अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीची रक्कम आणि गुन्ह्यासाठी वापरलेली कार जप्त केली आहे.
१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास एका ७० वर्षीय वृद्धाला कालिका माता मंदिरासमोरून एका चारचाकी वाहनातून लिफ्ट देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी त्यांच्या खिशातून २५,००० रुपये चोरले. या घटनेनंतर वृद्धाने तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी गेंदालाल मिल परिसरात सापळा रचून अर्शद शेख रज्जाक शेख (वय ३२) आणि अताउर रेहमान मोहम्मद शकील (वय ३५) या दोन आरोपींना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेली २५,००० रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे २ लाख रुपये किमतीची ‘स्विफ्ट डिझायर’ कार जप्त केली. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजीव मोरे करत आहेत.





