
क्रिकेट खेळताना १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; छातीत बॅट मारल्याचा वडिलांचा आरोप
दोन महिन्यांपासून न्यायासाठी वडिलांची वणवण; अखेर पोलीस अधीक्षकांकडे धाव
जळगाव/धरणगाव: धरणगाव तालुक्यातील रेल येथे दोन महिन्यांपूर्वी क्रिकेट खेळताना झालेल्या १२ वर्षीय गणेश नवल पाटील या बालकाच्या मृत्यूला आता एक वेगळे व धक्कादायक वळण मिळाले आहे. गणेशचा मृत्यू नैसर्गिक नसून, खेळताना त्याच्या छातीत बॅट मारल्यामुळेच त्याचा जीव गेल्याचा गंभीर आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस दाद देत नसल्याने हताश झालेल्या वडिलांनी अखेर जिल्हा पोलीस अधीक्षकांचे दार ठोठावले आहे.
नेमकी घटना काय?
१३ मार्च रोजी रेल गावातील मैदानावर गणेश पाटील हा मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना अचानक कोसळला होता. त्याला तातडीने जळगाव येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्यावेळी कुटुंबीयांनी कोणताही संशय न घेतल्याने, शवविच्छेदन (Post-mortem) न करताच गणेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
मुलांच्या सांगण्यातून सत्य आले समोर!
अंत्यसंस्कारांनंतर गावातील इतर मुलांकडे चौकशी केली असता एक धक्कादायक माहिती समोर आली. क्रिकेट खेळत असताना एका मुलाने गणेशच्या छातीत जोरात बॅट मारली होती. त्यानंतर तो मुलगा भीतीपोटी तातडीने मैदानावरून घरी पळून गेला आणि काही वेळातच गणेश मैदानावर कोसळला, असा दावा गणेशचे वडील नवल पाटील यांनी केला आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
या धक्कादायक प्रकारानंतर नवल पाटील यांनी पाळधी पोलीस दूरक्षेत्र आणि धरणगाव पोलीस ठाण्यात वारंवार चकरा मारल्या. संबंधित मुलावर आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, दोन महिने उलटूनही स्थानिक पोलिसांकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. स्थानिक पातळीवर न्याय मिळत नसल्याचे पाहून अखेर पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे. या तक्रारीनंतर आता पोलीस प्रशासन काय कारवाई करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.





