
वाढत्या प्राणघातक अपघातांवर पोलिसांचा अॅक्शन प्लॅन
जिल्हा पोलिसांची सर्व अधिकाऱ्यांसोबत व्हीसी बैठक; दारू पिऊन वाहन चालवणारे, ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाईचे आदेश
जळगाव : जिल्ह्यात वाढत्या प्राणघातक अपघातांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी जिल्ह्यातील दोन्ही अपर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ), पोलीस स्टेशन प्रभारी, वाहतूक शाखेचे अधिकारी तसेच हायवे स्टेट पॅट्रोल (HSP) विभागातील अधिकारी व अंमलदारांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
बैठकीत वाढत्या फेटल अपघातांचे कारण, अपघातप्रवण ठिकाणे, वेळा आणि अपघातातील वाहनांचा अभ्यास करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. विशेषतः महामार्गांवरील निष्काळजीपणा, अवैध प्रवासी वाहतूक, दारू पिऊन वाहन चालवणे आणि ओव्हरलोड वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीत एमआयडीसी परिसरातील ट्रक चालकांसाठी विशेष जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील ट्रॅक्टर चालकांसाठीही वाहतूक नियम आणि सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अपघातानंतर तातडीची मदत मिळावी यासाठी ढाबे आणि हॉटेल चालकांना सीपीआर व प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या वाहनात फर्स्ट एड बॉक्स उपलब्ध ठेवण्याचेही आदेश देण्यात आले.
महामार्गांवर रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या ट्रकांवर कारवाई, लग्नसराईच्या काळात ओव्हरलोड प्रवासी वाहतूक करणाऱ्या टेम्पोंवर नियंत्रण तसेच अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
अपघातग्रस्तांना वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील अॅम्ब्युलन्स यंत्रणा अधिक सक्षम करण्यावरही भर देण्यात आला. जिल्ह्यातील सुमारे ७५ टक्के अपघातग्रस्तांना नॉन-अॅम्ब्युलन्स वाहनांमधून हलवले जात असल्याचे निदर्शनास आल्याने यावर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली.
याशिवाय, एनएचएआय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आलेल्या रस्ते सुधारणा व स्ट्रक्चरल बदलांच्या प्रस्तावांचा पाठपुरावा करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
वाहतूक सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवून नागरिकांमध्ये नियमपालनाची सवय निर्माण करण्यावरही पोलिस प्रशासनाने भर दिला आहे.




